आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी येथे पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छता सेवा द्या सेवा घडू द्या

तीर्थक्षेत्र आळंदी येथे पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छता सेवा द्या सेवा घडू द्या

आळंदी :-तीर्थक्षेत्र आळंदी येथे जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानास शनिवार दि. २३ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानोबा महाराज व जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पवित्र इंद्रायणी नदीचे विधिवत पूजन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.

या अभियानासाठी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागांतून चार हजारांहून अधिक भाविक व संग्राम सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलांचाही लक्षणीय सहभाग या मोहिमेत पाहायला मिळाला. समाजातील सर्व स्तरांतून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छ, निर्मळ व प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानामध्ये पर्यावरण संरक्षण, नदी संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी कार्य करण्यात आले. हजारो टन कचरा नदीपात्रातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नदी संरक्षणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान मधील विश्वस्त चैतन्य महाराज कबीर तसेच माऊली वीर यांच्या हस्ते स्वच्छता अभियानात सहभागी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले. आळंदी नगरपालिका प्रशासनाच्या वतीनेही या अभियानाचे विशेष कौतुक करण्यात आले.

इंद्रायणी सेवा फाउंडेशन यांच्या वतीने अस्थी विसर्जन कुंड परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी साचलेली मडकी व कचरा बाहेर काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमाची उपस्थित मान्यवरांनी विशेष दखल घेतली.

या अभियानास अखिल भारतीय संग्राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मानकर, सिद्धेश्वर कोळी, लेफ्टनंट जनरल पश्चिम महाराष्ट्र गणेश सस्ते, रविभाऊ लांडगे, प्रशांत दादा कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता ताई तापकीर, नगरसेविका साक्षीताई कुऱ्हाडे, कालिदास तापकीर, सोमनाथ कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, संकेत कुऱ्हाडे, श्रीपादजी अजित वडगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैष्णवी जाधव,नारायण जाधव, बाळकृष्ण स्वामी महाराज (डिस्कळ, ता. खटाव, जि. सातारा) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे सदस्य अनुराग जैध यांनीही अभियानात सहभाग घेत सेवा कार्यात योगदान दिले. संपूर्ण परिसरात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे हे अभियान नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरले.



