आळंदी शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी धर्मशाळा व मंगल कार्यालय चालक, मालक व व्यवस्थापक यांची संयुक्त बैठक संपन्न

आळंदी शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी धर्मशाळा व मंगल कार्यालय चालक, मालक व व्यवस्थापक यांची संयुक्त बैठक संपन्न
आळंदी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून बेशिस्त वाहनचालकांमुळे घडलेल्या अपघातांमध्ये तीन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या तसेच भविष्यातील उपाययोजना याबाबत आज सोमवार दिनांक १८/०५/२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस प्रशासन व दिघी-आळंदी वाहतूक शाखा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मशाळा व मंगल कार्यालयांचे चालक, मालक व व्यवस्थापक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीस मा. नगराध्यक्ष, आळंदी नगरपरिषद, मा. मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी पोलीस स्टेशन, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी-आळंदी वाहतूक शाखा तसेच शहरातील विविध धर्मशाळा, मंगल कार्यालय चालक, मालक व व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी मा. मुख्याधिकारी यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीमागील उद्देश स्पष्ट केला. लग्नसराई, यात्रा, एकादशी व विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाबरोबरच सर्व संबंधितांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीमध्ये धर्मशाळा व मंगल कार्यालय चालक, मालक व व्यवस्थापक यांनी शहरातील पार्किंगची कमतरता, अपुरे दिशादर्शक फलक, रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेशिस्त वाहन पार्किंग, अपुरे बायपास रस्ते, प्रदक्षिणा मार्गावरील अडचणी, जड वाहतुकीमुळे निर्माण होणारी कोंडी यासह विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. वडगाव रोड येथील नगरपरिषदेचे पार्किंग तातडीने सुरू करणे, बहुमजली पार्किंगची निर्मिती करणे, शहरातील डी.पी. रोड व बायपास रस्ते विकसित करणे, सर्वत्र दिशादर्शक व नो-पार्किंग फलक बसविणे, अतिक्रमण हटविणे तसेच पार्किंगसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली.
बैठकीदरम्यान मा. श्री. डी. डी. भोसलेपाटील यांनी शहरातील स्पीडब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच वाय जंक्शन परिसरातील मालवाहतूक वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, PMPML परिसरातील बेशिस्त रिक्षा पार्किंग तसेच प्रदक्षिणा रोडवरील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी-आळंदी वाहतूक शाखा यांनी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. चाकण चौक परिसरातील पार्किंग अपुरी पडत असल्याने पर्यायी पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर दिशादर्शक फलक व पार्किंग फलक बसविणे, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे व वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने दीर्घकालीन नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी पोलीस स्टेशन यांनी शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण बेशिस्त वाहनचालक असल्याचे नमूद केले. मंगल कार्यालय व धर्मशाळांनी बुकिंगच्या वेळेस येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगबाबत स्पष्ट माहिती ग्राहकांना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच DJ परवानगीसाठी पोलीस प्रशासनाची परवानगी व नगरपरिषदेचा ना-हरकत दाखला घेणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मा. नगराध्यक्ष यांनी शहरातील वाढत्या वाहतूक समस्येची गंभीर दखल घेत प्रशासन व नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. वडगाव रोड येथील पार्किंग सुरू करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले. तसेच शहरात वाहतूक नियंत्रणासाठी CCTV कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक साहित्य पोलीस प्रशासनास उपलब्ध करून देण्यात येईल असेही सांगितले.
बैठकीच्या शेवटी मा. मुख्याधिकारी यांनी बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही जाहीर केली. शहरातील मुख्य रस्त्यांवर दिशादर्शक फलक बसविणे, स्पीडब्रेकरवर पांढरे पट्टे मारणे, अतिक्रमणांवर कारवाई करणे, वाय जंक्शन येथील मजूर अड्डा स्थलांतरित करणे, मालवाहतूक वाहनांबाबत संबंधितांना सूचना देणे, तसेच शहरातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबत धर्मशाळा व मंगल कार्यालयांना निर्देश देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच पुढील आठ दिवसांत वाहतूक व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सदर बैठक मा. नगराध्यक्ष यांच्या परवानगीने समाप्त करण्यात आली.



