Breaking Newsभारत

पुणे /आळंदी :- हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त 200 देशी वृक्ष लागवड

पुणे /आळंदी :- हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त 200 देशी वृक्ष लागवड

वार्ताहर :- अनिल जोगदंड

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जयंती आणि ‘रानमळा पॅटर्न’चे प्रणेते,निसर्गवासी पी.टी.शिंदे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पर्यावरण जागर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य,हुतात्मा शिवराम हरी राजगुरू पत्रकार संघ,खेड तालुका,नेचर फाउंडेशन,आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.२४) रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमा अंतर्गत दोनशे देशी वृक्षप्रजातींची झाडे लावण्यात आली.

चाकण-आळंदी वनपरिक्षेत्रातील माजगाव,चिंबळी (ता. खेड) येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला चाकण वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी  संतोष कंक,खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे,पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद शिंदे,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर,वराळे सी.आय.ई.इंडिया गेअर्स डिव्हिजनचे उमेश ठाकरे,उपसरपंच राहुल चव्हाण,उद्योजक सुमित जाधव,अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष अशोक येळवंडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत बोरावके, सहखजिनदार सुनील बटवाल,प्रसिद्धी प्रमुख अनिल जोगदंड,चाकण वनविभाग नियतक्षेत्र अधिकारी अचल गवळी,नियतक्षेत्र अधिकारी नवनाथ पगडे,वनसेवक किसन पारधी,माणिक वाळके,बाबासाहेब भंडारे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना हनुमंत देवकर यांनी मानवी जीवनातील झाडांचे अनन्यसाधारण महत्व स्पष्ट करत कोरोना सारख्या महामारीत ऑक्सिजन बाबत झालेली गैरसोय आठवण करून दिली.त्यावेळी मानवाला वृक्ष आणि ऑक्सिजन याची किंमत जाणवली असे त्यांनी स्पष्ट केले.यामुळेच वृक्षारोपण कार्यक्रम हा सातत्यपूर्ण असला पाहिजे असे त्यांनी सांगितले.या उपक्रमाबद्दल त्यांनी पत्रकार संघाचे अभिनंदन केले.स्मृतिवृक्षाची आठवण करून देत आपल्या प्रियस्नेहीजनांच्या अस्थी नदीत विसर्जित न करता त्या अस्थी स्नेही जणांच्या स्मृती पित्यर्थ झाडे लावत त्या खाली विसर्जित करण्याचा व ते झाड जीवनभर जपण्याचा अनोखा उपक्रम देखील पर्यावरण जागर प्रतिष्ठान राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी उपक्रमाला शुभेच्छा देत येत्या काळात तालुक्यात रानमळा पॅटर्नची ‘एक विद्यार्थी एक झाड’ ही योजना राबविणार असल्याचे सांगत पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आनंद झाड,स्मृतीवृक्ष या उपक्रमांची माहिती दिली.

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत माजगाव भागातील वनविभागाच्या झालेल्या प्रगती बाबत आवर्जून उल्लेख केला.येथील वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपन यामुळे हा परिसर हिरवागार झाला असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास लाभल्याचे त्यांनी सांगितले.उपक्रमाला शुभेच्छा देत असताना पी.टी.शिंदे साहेबांच्या कार्याची आठवण करून दिली.

उपसरपंच राहुल चव्हाण यांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून देत पत्रकार संघाच्या वृक्षारोपण कार्यक्रमाला चिंबळी गावच्या वतीने शुभेच्छा दिल्या तसेच येत्या काळात वृक्ष संवर्धनासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वृक्षारोपण बाबतची दूरदृष्टी स्पष्ट करत सरकारने कर्जमाफी करत असताना एक एकर मध्ये बारा वृक्षाची लागवड व संवर्धन करण्याबाबतचे सक्तीचे धोरण राबवावे.यामुळे येत्या काळात जनजागृतीसाठी वेगळी योजना आखण्याची गरज पडणार नाही असे विचार मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button