आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनानिमित्त आळंदीत “रजोत्सव” उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनानिमित्त आळंदीत “रजोत्सव” उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनानिमित्त आळंदी नगरपरिषद, क्षितिज बहुउद्देशीय संस्था तसेच युनिसेफ, वॉश युनायटेड आणि वॉश इयर्स कोअॅलिशन यांच्या संयुक्त विद्यमाने “रजोत्सव” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महिला आरोग्य, मासिक पाळीबाबत जागरूकता आणि समाजातील सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी “मासिक पाळी विषयातील पुरुषांचे योगदान” या संकल्पनेला विशेष महत्त्व देत मासिक पाळी जनजागृती प्रतिज्ञापत्राचे विमोचन करण्यात आले तसेच उपस्थितांनी मासिक पाळी स्वच्छता प्रतिज्ञा घेऊन जनजागृतीचा संदेश दिला.
क्षितिज संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा स्नेहल चौधरी यांनी मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता, महिलांचे आरोग्य, पोषण आहार, पुरुषांचा सहभाग तसेच रजोनिवृत्ती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर करून समाजात सकारात्मक आणि संवेदनशील वातावरण निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.
मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर यांनी महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी “आनंदी रूम” सारखी सुविधा आळंदीमध्येही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. तसेच महिलांच्या आरोग्यविषयक उपक्रमांना नगरपरिषदेचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमास आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. प्रशांत दादा कुऱ्हाडे, मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर, उपनगराध्यक्षा सौ. सुजाता तापकीर, महिला व बाल कल्याण सभापती सौ. ऋतुजा तापकीर, नगरसेविका सौ. साक्षी कुऱ्हाडे, सौ. पूजा गुंडरे तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती वैशाली पाटील आणि क्षितिज सामाजिक संस्था चे श्रीमती स्नेहल चौधरी मॅडम युनिसेफ प्रमुख आनंद घोडके, संदीप तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंकिता गुडजी , अतुल राऊत,
राजलक्ष्मी पाटील, निसर्गा मेश्राम, अमृता, निशांत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले
महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला. मासिक पाळी ही लाज नव्हे तर नैसर्गिक प्रक्रिया असून त्याविषयी खुलेपणाने संवाद होणे आवश्यक असल्याचा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.



