Breaking Newsभारत

आळंदी : आळंदीत राष्ट्रनिर्मितीच्या संस्कारमूल्यांची मुहूर्तमेढ! ; शालेय शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रम

आळंदीत राष्ट्रनिर्मितीच्या संस्कारमूल्यांची मुहूर्तमेढ! ; शालेय शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रम

आळंदी : शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यातील प्रेरणादायी वक्त्यांची ( कीर्तनकारांची ) कार्यशाळा आळंदी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या कार्यशाळेत सद्गुरु श्री जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदीचे अध्यक्ष श्री. संदीपानमहाराज शिंदे, डॉ. नारायणमहाराज जाधव, डॉ. चिदंबरममहाराज साखरे, श्री. उल्हासमहाराज सूर्यवंशी, आळंदी संस्थानचे विश्वस्त श्री. पुरुषोत्तममहाराज पाटील, श्री. बाळासाहेब काशीद व श्री. बाळासाहेब शेवाळे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
मान्यवरांनी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश, अध्यापनातील पद्धतशीरता, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जडणघडण तसेच आत्मसंरक्षणाबरोबर चारित्र्यनिर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना व वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करत मूल्याधिष्ठित शिक्षण मुलांना देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. संत साहित्य आणि संविधानिक मूल्यांचा संगम घडवून राष्ट्रनिर्मितीचे भक्कम पायाभूत कार्य या उपक्रमातून साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाविषयी जागरूकता निर्माण होऊन जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी अखिल वारकरी गुरुकुल संघ तसेच राज्यातील वारकरी शिक्षण संस्थांचे सर्व अध्यापक आणि हजारो कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “राष्ट्रनिर्मितीची संस्कारमूल्ये” या अभ्यासक्रम पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्यातील प्रेरणादायी व्याख्याते ( कीर्तनकार ) शाळांमध्ये जाऊन या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत संतांची शिकवण, नैतिक जबाबदारी आणि राष्ट्रभावनेचे संस्कार पोहोचविणार आहेत. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासाठी विशेष पाऊल उचल्याबाबत सर्वांनी जयघोषात त्यांचे अभिनंदन केले. हा उपक्रम शालेय शिक्षण विभाग व वारकरी संप्रदाय युवा मंच यांच्या संयुक्त सहकार्याने यशस्वीपणे आळंदी येथे पार पडला. या प्रसंगी राज्यातील हजारो संत साहित्य अभ्यास, अध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उमेश महाराज बागडे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. किशोर महाराज धुमाळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button