श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत मातृ–पितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा-

श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत मातृ–पितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा-

सश्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर प्रशालेत संस्कारक्षम सोहळा मातृ –पितृ पूजन मोठ्या उत्साहात साजरा झाला .
कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून ह.भ.प. भाग्यश्री भाग्यवंत, उद्योजक व आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश झोंबाडे, आळंदी नगर परिषदेच्या नगरसेविका ऋतुजा घुंडरे, माजी विद्यार्थी व रोबोटिक्स इंजिनिअर नितीश साळुंखे व परिवार, संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक श्रीधर कुऱ्हाडे, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड , मुख्याध्यापक प्रदीप काळे, माध्यमिक पा.शि.संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षिरसागर , उपाध्यक्षा तेजश्री साळुंखे , ज्योती श्रीखंडे , अंजली ढगे,मनिषा देवकाते,सविता उपाध्ये, शिक्षक सूर्यकांत खुडे, संजय कंठाळे, पालक,विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
माऊलींच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविकाद्वारे शालेय अभ्यासक्रमा बरोबर हा संस्कारक्षम सहशालेय उपक्रम साजरा करण्यामागचा उद्देश तसेच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावेत यासाठी आई वडील, शिक्षक,शाळा यांचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. विद्यार्थिनी ईश्वरी ढगे हिने मातृ पितृ पूजन म्हणजे आई – वडीलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो.आई संस्कार करते तर बाबा जगाशी लढायला शिकवतात असे सांगितले. पालक ह.भ.प. तुकाराम कुरकुटे यांनी भारतीय संस्कृतीची जोपासना ही शालेय शिक्षणातून होत असते. प्रशाला दरवर्षी हा उपक्रम राबवत असल्याबद्दल संस्था, प्रशाला यांचे आभार व्यक्त केले.ह.भ.प.मुक्ता मालुंजकर यांनी शिक्षण विकत घेता येते पण संस्कार विकत घेता येत नाहीत. गेली 18 वर्ष प्रशाला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार करत आहे. असे नमूद केले.
अजित वडगावकर यांनी विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावे यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. तसेच भविष्यात वृद्धाश्रमाची संख्या कमी होण्यासाठी अशा या संस्कारक्षम उपक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले. नितीन साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न,मेहनत,सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब जीवनात करा. तसेच आयुष्याचा पाया शालेय जीवनात शिक्षकांकडून घडवला जातो. त्यामुळे त्यांचा नेहमी आदर करा असे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांकरिता एक रोबोटिक मॉडेल व दहा हजार एकशे अकरा रुपये (१०१११/-)प्रशालेच्या भौतिक सुविधा करीता देऊन शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ऋतुजा घुंडरे यांनी मुलांची प्रगती ही आई-वडिलांचे आशीर्वाद असतात. आई-वडिलांनी मुलांशी विविध विषयावर चर्चा केली, धार्मिक ऐतिहासिक स्थळी एकत्र जायला पाहिजे. त्यांच्याबरोबर एकत्र वेळ घालवला पाहिजे असे विचार व्यक्त केले. सुरेश झोंबाडे यांनी आई-वडिलांचे महत्त्व सांगत आईसाठी तिच्या आजारपणात वेळ देता यावा या कारणास्तव आपण सरकारी नोकरी सोडल्याचे सांगितले. व तिची सेवा केल्याने उद्योगधंद्यात नाव कमवू शकलो तसेच आई-वडिलांच्या आशीर्वादाने, संस्काराने आज समाजात मानाचे जीवन जगत आहे असे सांगितले. प्रशालेच्या भौतिक सुविधांसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. ह.भ.प.भाग्यश्री भाग्यवंत यांनी भक्त पुंडलिकाचे उदाहरण देत आई ,वडील,मुले यांनी मोबाईल, टीव्ही इ. सोशियल मीडियापासून दूर राहून एकमेकांना वेळ द्यावा असे सांगत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशालेची सहल यावर्षी रायगड किल्ल्यावर गेली होती सहलीवर आधारित परीक्षा घेण्यात आली होती. त्यातील तीन क्रमांकाचे विद्यार्थी व एक उत्तेजनार्थ विद्यार्थ्यास मान्यवरांच्या हस्ते वस्तुरूप बक्षीस, प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
सहलीसाठी पाच हजार रुपये योगदान दिलेले पालक हेमंत जामदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना कुमकुम तिलक करून फुले वाहून पालकांच्या गळ्यात हार घातला. तदनंतर पालकांनी मुलांना कुमकुम तिलक करत आपल्या गळ्यातील हार मुलांच्या गळ्यात घातले. मुलांनी आई-वडिलांच्या पायावर डोके ठेवून वंदन केले. मुलांनी आई-वडिलांच्या भोवती सात प्रदक्षिणा घातल्या व आई-वडिलांची सेवा करण्याचा दृढ निश्चय केला. आई-वडिलांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून “त्रिलोचन बना व आयुष्यात यशस्वी व्हा” असे आशीर्वाद दिले. मुलांनी पालकांना व पालकांनी मुलांना गोड खाऊ देऊन तोंड गोड केले अशा रीतीने मातृ-पितृ पूजनाचा भावपूर्ण सोहळा संपन्न झाला. वैशाली शेळके आभार मानले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. राहुल चव्हाण,आरती गावडे यांनी सूत्रसंचालन केले.निशा कांबळे वर्षा काळे,प्रतिभा भालेराव, गीतांजली मोरस्कर, गजानन राठोड,राजू सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.



