आळंदी देवस्थानातील गैरव्यवहार प्रकरणावर पत्रकार परिषद; सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल जाहीर.

आळंदी देवस्थानातील गैरव्यवहार प्रकरणावर पत्रकार परिषद; सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल जाहीर.
विठ्ठल शिंदे

तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात घडलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणानंतर देवस्थान प्रशासनाने पत्रकार परिषद घेत संबंधित घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. स्वयंसेवक विशाल वारुळे यांच्याविरोधात संशय व्यक्त झाल्यानंतर सीसीटीव्ही तपासणी व पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
देवस्थान प्रशासनाच्या माहितीनुसार, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीदरम्यान काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती आळंदी पोलीस ठाण्याला देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाने या घटनेला अत्यंत गंभीर मानत मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, मंदिरातील सर्व कर्मचारी, सेवेकरी व सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. मंदिरात येण्या-जाण्यासाठी निश्चित प्रवेशद्वाराचा वापर बंधनकारक करण्यात आला असून सर्वांची तपासणी सुरक्षा रक्षकांकडून केली जाणार आहे. तसेच मंदिर परिसरात पिशव्या किंवा संशयास्पद वस्तू आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
देवस्थान प्रशासनाने पुढे सांगितले की, दानपेटी मोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली, अत्याधुनिक सीसीटीव्ही व्यवस्था व एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील सर्व कॅमेरे एआय तंत्रज्ञानाशी जोडण्याचे कामही प्रस्तावित आहे.
याशिवाय कर्मचारी व सेवेकऱ्यांच्या उपस्थितीसाठी डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्याची तयारी सुरू असून आरएफआयडी प्रणालीद्वारे प्रवेश नियंत्रण करण्यात येणार आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर विश्वस्त मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली असून संबंधित विभागप्रमुखांकडून खुलासा मागविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणामुळे भाविकांमध्ये चर्चा सुरू झाली असून मंदिर प्रशासनाने “सत्य समोर येईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.



