Breaking News महाराष्ट्र

पुणे : आळंदी येथे फळे कापून अनोखा वाढदिवस साजरा

आता वाढदिवसाला केक नको फळे कापा – पत्रकार लक्ष्मण लटपटे
आळंदी येथे फळे कापून अनोखा वाढदिवस साजरा

पुणे जिल्हा वार्ताहर : दिनेश कुऱ्हाडे 

आळंदी : स्थानिक शेतकऱ्यांच्या कलिंगडाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे केकला महागडा खर्च न करता अशी फळे विकत घेऊन ती कापून वाढदिवस साजरा केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास हातभार लागेल, या उद्देशाने सर्वधर्म समभाव या उद्देशाने श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी सेवा फौंडेशनचे विश्वस्त आणि युवा पत्रकार हभप लक्ष्मण महाराज लटपटे शास्त्री यांनी आपला वाढदिवस कलिंगड कापून साजरा केला. आळंदीमधील इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या संपर्क कार्यालयात हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता.
विविध समाजांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने इंद्रायणी सेवा फौंडेशनची निर्मिती केली आहे. या फौंडेशनकडून नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबविले जातात. सध्या वाढदिवसाला केक कापण्याचा ट्रेंड वाढत चाललेला आहे. केक खाण्यापेक्षा तोंडाला लावणे, क्रीम न खाणे असे करून तो केक खाण्यापेक्षा अधिक वाया जातो.
लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांनी उदरनिर्वाहासाठी विविध प्रकारची शेती करण्यास सुरुवात केली. कलिंगडाची लागवड सध्या बऱ्याच लोकांनी केली आहे; पण आता कलिंगडाला दर खूपच कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे प्रत्येकाने केकऐवजी कलिंगड किंवा इतर कोणतेही फळ कापून आपला वाढदिवस साजरा केला तर प्रत्येक दिवशी अनेक फळे ही विकली जाऊ शकतात व त्यांच्या विक्रीमध्ये वाढ होऊन त्यांचा फायदा नवीन शेतकऱ्यांना होऊ शकतो, या विचारातून इंद्रायणी सेवा फौंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण महाराज लटपटे शास्त्री यांनी कलिंगड कापून नवा पायंडा पाडून दिला आहे.
इंद्रायणी सेवा फौंडेशन सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कार्यरत आहे. या ग्रुपचे सदस्य यापुढेही फळे कापून व वाटून वाढदिवस साजरा करणार आहेत. यावेळी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे,  पत्रकार श्री दिनेश कुऱ्हाडे (माऊलीचे मानकरी) तसेच इंद्रायणी सेवा फाऊंडेशन पुणे महाराष्ट्र चे (सचिव) ,पत्रकार अनिल जोगदंड संदीप शिंदे,हनुमान घोंगडे,भावना शिंदे, मनिषा शिंदे,आदित्य शिंदे आणि श्रीमंत ग्रुप चे अध्यक्ष दादासाहेब करंडे उपस्थित होते.
केक कापून वाढदिवस साजरा करणे, अवाढव्य खर्च करणे बरोबर नाही. त्यामुळेच इंद्रायणी सेवा फौंडेशन च्या माध्यमातून कलिंगड कापून वाढदिवस साजरा केला. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगला भाव मिळावा, त्याची मागणी वाढावी हाच या मागचा उद्देश आहे असे इंद्रायणी सेवा फौंडेशन चे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.