Breaking Newsभारतशिक्षा

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न

संस्कार व संस्कृतीचे दर्शन म्हणजे श्री ज्ञानेश्वर विद्यालय – प्रदीपदादा वळसे पाटील

जीवनाचे लक्ष साधत असताना शालेय जीवनामध्ये विद्यार्थी यशस्वी वाटचाल करतो त्यावेळी त्यांच्या पाठीवर प्रेरणा रुपी शाबासकीची थाप असणे खूप महत्त्वाचे असते. या अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून इयत्ता 10 वी मध्ये प्रथम आलेल्या भक्ती राऊत हिला प्रमाणपत्र, ट्रॉफी, मनगटी घड्याळ व 17500 ₹ ची रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. याच प्रमाणे विद्यालयातील इयत्ता पाचवी, आठवी, दहावी व इयत्ता बारावी मधील प्रथम तीन विद्यार्थी तसेच विविध विभागाच्या विविध स्पर्धा परीक्षेत (स्कॉलरशिप, एन एम एम एस, एन टी एस, टिळक महाराष्ट्र, राष्ट्रभाषा हिंदी, विविध विषयाच्या परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या गुणवत्तांचा पुष्प, प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मान सोहळा मोठ्या दिमाखदात वातावरणात संपन्न झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. शेखर महाराज जांभुळकर, प्रमुख उपस्थितीमध्ये दि. महाराष्ट्र राज्य सह. बँक असो. लि. मुंबई चे चेअरमन सी.ए. भाऊ भगवंत कड व व्हा. चेअरमन भीमाशंकर सह. साखर कारखाना व निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दादा वळसे पाटील समवेत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, सदस्य अनिल वडगावकर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप लोखंडे, उद्योजक राहुल बांगर, बाबुलाल घुंडरे, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडवळकर, अनुजायीनी राजहंस, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व विभागातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सचिव अजित वडगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाचे स्वरूप विषद केले. तसेच संस्थेच्या यशस्वी व प्रगतीच्या शिरपेचात तुरा रोवणाऱ्या सर्व गुणवंतांचे अभिनंदन करून जीवनामध्ये येणाऱ्या नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. व पुढील पिढीतील विद्यार्थ्यांनी या गुणवंतांचा आदर्श घेऊन यशस्वी वाटचाल करावी यासाठी या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले .

तद्नंतर विद्यार्थी मनोगतातून भक्ती राऊत हिने शिक्षकांनी दिलेले ज्ञान व संस्कार याच्या बळावर जीवनाचे ध्येय प्राप्त करू आणि देशाची सेवा करून परिवाराचे व शाळेचे नाव मोठे करू असे आश्वासन देत शिक्षकाविषयीचा कृतज्ञता भाव व्यक्त केला.

प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी विद्यालयातील उपक्रमांची माहिती देऊन प्रशालेची गुणवत्ता जपण्याचे काम आदरणीय गुरुजन करतात म्हणूनच इतके सुंदर व आदर्श विद्यार्थी घडतात असे मत व्यक्त केले. डॉ. दीपक पाटील यांनी गुणवंतांचा सत्कार म्हणजे एक सोहळाच आहे असे उद्गार काढून त्यांनी गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले व महर्षी व्यासांची माहिती देऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.

प्रदीपदादा वळसे पाटील यांनी आपल्या मनोगतातून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना फक्त ज्ञान देणारी शिक्षण संस्था नसून विद्यार्थ्यांमध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ सारख्या उपक्रमातून संस्कार आणि मूल्यांची जडणघडण करणारे विद्यालय असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. श्री ज्ञानेश्वर विद्यालय हे संस्कार व संस्कृतीचे दर्शन घडविणारे विद्यालय आहे असे गौरवास्पद उद्गार काढत संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नंतर भाऊ कड यांनी स्वतःच्या कार्याची ओळख करून देत हात – पाय चालेपर्यंत काम करावे असे सांगितले. व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह .भ .प. शेखर महाराज यांनी जसा राजा तशी प्रजा या उक्तीप्रमाणे संस्था / शाळा प्रशासन व सर्व शिक्षकांचे कौतुक करून त्यांनी श्री ज्ञानेश्वर विद्यालय सर्वांगाने समृद्ध आहे असे सांगितले व विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर योग्य तिथे केला पाहिजे असेही नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदीप काळे यांनी व्यक्त केले.
माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button