आळंदी वडगाव रोडवरील टॉयलेट परिसरात गैरप्रकार; सीसीटीव्ही, लाईटची मागणी.

आळंदी वडगाव रोडवरील टॉयलेट परिसरात गैरप्रकार; सीसीटीव्ही, लाईटची मागणी.
आळंदी दि २( वार्ताहर ) : आळंदी वडगाव रोडवरील झोपडपट्टी परिसरातील नगरपालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक शौचालयात गैरप्रकार वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. या शौचालयात लाईट व्यवस्था नसल्याने आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला आहे. येथे दारू पिणे, जुगार खेळणे, अश्लील चाळे करणे यासारखे प्रकार सर्रास घडत असून, परिसरात मृतदेह सापडण्याच्या घटनांनीही चिंता वाढवली आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या शौचालयाचा वापर लहान मुले, मुली, महिला आणि ज्येष्ठ नागरिक करतात. मात्र, असुरक्षित वातावरणामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही येथे दारूच्या नशेत अनेक व्यक्ती मृतावस्थेत आढळल्या आहेत. यामुळे तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे, लाईट व्यवस्था आणि वॉचमनची नियुक्ती करण्याची मागणी सोशल वर्कर नियती ताई शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व्यापारी आघाडीने संबंधितांकडे केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी पोलीस ठाणे यांना लिहिलेल्या पत्रात, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन आणि रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि माध्यमांना पाठवण्यात आली आहे. आळंदी पोलीस आणि नगरपालिकेवर यासंदर्भात त्वरित कारवाईचे दडपण आहे.

