आळंदी येथील जाहूरकर महाराज संस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश

आळंदी येथील जाहूरकर महाराज संस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश

आळंदी नगरपरिषद हद्दीतील प्रदक्षिणा रोड, आळंदी येथे असलेल्या जाहूरकर महाराज संस्था या ठिकाणी निवासी स्वरूपात राहणाऱ्या बालकांबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आळंदी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आहे.
दि. ६ मार्च २०२६ रोजी दैनिक ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सदर संस्थेमध्ये अध्यात्मिक शिक्षण घेत असलेल्या १२ वर्षांच्या मुलीवर शारीरिक व मानसिक शोषण झाल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी तसेच आळंदी दामिणी महिला पोलीस पथकाच्या उपस्थितीत संस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सदर पाहणीदरम्यान महिला व बाल विकास विभागाचे शासन निर्णय दिनांक ०२ नोव्हेंबर २०१५ व ०३ जुलै २०२५ नुसार खाजगी वसतिगृहांसाठी लागू असलेल्या अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
पाहणीदरम्यान आढळलेल्या प्रमुख त्रुटी
• विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक पालकांचे अर्ज व छाननी समिती उपलब्ध नव्हती.
• विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज व आधारकार्ड नोंदी उपलब्ध नव्हत्या.
• संस्थेमध्ये नियमांनुसार कर्मचारी वर्ग (रखवालदार इ.) उपलब्ध नव्हता.
• अभ्यासिका व भोजन हॉल स्वतंत्र नसून एकाच हॉलमध्ये वापर होत असल्याचे आढळले.
• स्वयंपाकगृह व निवासासाठी आवश्यक जागा अपुरी होती.
• बालकांच्या संख्येनुसार पुरेशी स्नानगृहे व स्वच्छतागृहे उपलब्ध नव्हती तसेच ती हवेशीर नव्हती.
• विद्यार्थ्यांसाठी भोजनाचा निश्चित मेनू ठेवलेला नव्हता.
• विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीचे उरलेले अन्न सकाळी दिले जात असल्याचे आढळले.
• विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याची नोंद ठेवण्यासाठी गेट रजिस्टर उपलब्ध नव्हते.
• प्रथमोपचार पेटी उपलब्ध नव्हती तसेच अत्यावश्यक सेवांचे क्रमांक दर्शविणारे फलक नव्हते.
• तक्रार पेटी उपलब्ध नव्हती.
• संस्थेचे नियम व अटी दर्शविणारे कोणतेही फलक लावलेले नव्हते.
तपासणीदरम्यान सदर संस्थेकडे कोणत्याही शासन विभागाचा निवासी विद्यार्थ्यांना ठेवण्याचा वैध परवाना नसल्याचे देखील स्पष्ट झाले.
संस्था अनधिकृत घोषित
वरील सर्व बाबींचा विचार करून तसेच महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार जाहूरकर महाराज संस्था ही अनधिकृत असल्याचे घोषित करण्यात येत असून बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर संस्था तात्काळ बंद करण्याचे आदेश मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद यांनी दिले आहेत.
बालकांचे पुनर्वसन
सदर संस्थेमध्ये राहत असलेली ४३ मुले व ४ मुली यांना पुढील शासकीय/मान्यताप्राप्त बालगृहांमध्ये सुरक्षितरीत्या हलविण्यात आले आहे :
1. ज्ञानेश बालमंदिर, फुलगाव (मरकळ रोड)
2. ज्ञानमंदिर बालगृह, नारकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे
3. सह्याद्री बालगृह, पञ्कटीका, घोडेगाव रोड, मंचर, जि. पुणे
कारवाईवेळी उपस्थित अधिकारी / कर्मचारी
• सीमा चारभे – कर व प्रशासकीय सेवा, आळंदी नगरपरिषद
• प्रदीप आवारी – लेखापरीक्षक, आळंदी नगरपरिषद
• वैशाली पाटील – सहा. प्रकल्प अधिकारी, आळंदी नगरपरिषद
• मिथिल पाटील – CLTC अभियंता, आळंदी नगरपरिषद
• पूजा श्रीहरी नाईक – म.पो.शी २८५७, आळंदी दामिणी पथक
• श्वेता विलास शेलकर – म.पो.शी २९६२, आळंदी दामिणी पथक
• अर्जुन घोडे – समुदाय संघटक, आळंदी नगरपरिषद
• शत्रुघ्न रुस्तुम खोकले – बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक), जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पुणे
• माधव खांडेकर – मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद



